Saturday, July 29, 2006

ललित

ललित


शुक्रवारची संध्याकाळ. अंगावर येणारा आणखी एक विकएन्ड. न्युयॉर्कला येउन मला एक महिना झाला. आणि चारमधले तीन विकएन्ड्स एकटाच घरात बसुन चॅटींग करण्यात आणि कॉम्प्युटरवर पिक्चर बघण्यात घालवलेत. इकडे येताना ड्रायव्हींग लायसन्स न काढल्याबद्दल आत्तापर्यंत स्वतःला शंभर वेळा तरी शिव्या घातल्या असतील. त्यामुळे या विकएन्ड्लापण घरीच बसण्याशिवाय काहीच पर्याय नाही म्हणुन उसासा टाकतच होतो की स्क्रीनवर एक मेसेज झळकला.... ललित शाह.

ललित शाह... एक अजब रसायन. एकदम मोकळा आणि बेफ़िकीर. त्याची आणि माझी ओळख कंपनीच्या एका मिटिंगमधे झालेली. आम्ही एकमेकांना फ़क्त व्हिडिओ कॉन्फ़रन्स मधे पाहीले होते आणि मीटींगनंतर माझ्या जागेवर येउन बसतो न बसतो तोच पठठ्य़ाने मेसेज टाकून मराठीत माझी चौकशी चालवली आणि तीही अगदी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी! वास्तविक माझ्या कंपनीमध्ये तो एका मोठया हुद्द्यावर आहे, पण त्याच्या बोलण्यात कसल्य़ाहीप्रकारचा अभिनिवेश नव्हता. मी अमेरीकेत आल्यापासुन आम्ही कामाच्या व्यापामुळे ('माझ्या कामाच्या व्यापामुळे' असे तो म्हणतो कारण त्याच्या मते तो ऑफिसमधे फ़क्त पाट्या टाकायला जातो! मीही तसे काही फारसे वेगळे करत नाही म्हणा!) फक्त दोनतीनदाच भेटु शकलो होतो.

त्याचा आलेला मेसेग जेव्हा मी उघडला तर त्यात त्याने विचारले होते 'ड्राइव्हींग करतोस का?'. आता मात्र मी अजुनच वैतागलो. अजुन एकदा स्वत:ला शिव्या घालत जेव्हा त्याला कारण विचारले तर म्हणाला, "घरी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलाय आज. येतोस?" मी त्याला माझी ड्रायव्हींगची अडचण सांगितली तसा त्याने लगेच श्रीनिवासबरोबर मला चिकटवुन दिला. मी भलताच खुष झालो. वास्तविक तो घरगुती कार्यक्रम म्हणजे शेअर मार्केटवर एक माहितीवजा व्याख्यान होते आणी तसा माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. पण चारचौघांमधे मिसळण्याची मला संधी मिळत होती हेही नसे थोडके.....

कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी सातची. श्रीनिवासला जरा जास्तच काम असल्यामुळे आम्ही ऑफीसमधून परस्परच जायचे ठरवले. त्याप्रमाणे संध्याकाळी साडेसहाला मी आणि श्रीनिवास त्याच्या कारने ललितकडे निघालो. दहा मिनीटातच आमची गाडी ललितच्या टुमदार दुमजली अपार्टमेंटसमोर येउन थांबली. श्रीनिवास कार पार्क करुन येईपर्यंत मी घराकडे पहात बसलो. घरासमोर एक ऐसपैस कारपार्कींग आणि छानशी हिरवळ. मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर छोट्या छोट्या कुंडयांमधे लावलेली वेगवेगळी शोभेची झाडे. कुंडयांच्या आजुबाजुला गारगोट्यांनी केलेली लक्षवेधी सजावट. एकुणच प्रसन्न वातावरण होते. आत जाताच ललित, त्याची पत्नी पल्लवी आणि पल्लवीच्या आई या सगळ्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले. ललितने त्यांच्याशी माझी ओळख करुन दिली. पल्लवी ताई आणि काकूंनी आस्थेने माझी विचारपुस केली आणि पुढचे दोन अडिच तास मी त्यांच्या घरचाच बनुन राहीलो.

घराच्या बेसमेंटला एक छोटासाच पण १५/२० लोक सहज बसतिल असा एक हॉल होता. तिथेच प्रस्तावित व्याख्यानाची जय्यत तयारी दिसत होती. काही आमंत्रित आधीच येउन बसलेले दिसत होते. एका टबलावर फराळाच्या पदार्थांची रेलचेल दिसत होती. माझे लक्ष वेधले ते समोशांच्या प्लेट्ने. ती रिकामी होण्याआधी फराळाचे आमंत्रण मिळते का नाही याची वाट बघत बसलो. ललितने तिथे बसलेल्या सगळ्यांशी ओळख करुन दिली तरि माझा एक डोळा समोशांच्या प्लेटवरच. ललितला बहुतेक माझ्या मनातले समजले असावे कारण त्याने लगेच मला फराळाला चलण्याचा आग्रह केला. मी पण 'नेकी और पुंछ पुंछ असे म्हणत (मनातल्या मनातच!) फराळाच्या टेबलकडे माझा मोर्चा वळवला. सुदैवाने अजुनही बरेचसे समोसे प्लेट्मध्ये दिसत होते आणि आनंदाने मी समोशांचा माझा पहिला हप्ता उचलला. तेवढ्यात ललितने मला एक गारेगार शितपेयही आणुन दिले. मी त्याला विचारले की एवढे सगळे पदार्थ आणले कुठुन? त्यावर हसत हसत तो म्हणाला, " आणतोय कुठुन?आम्ही सगळ्यांनी मिळुन घरीच बनवले आहेत. या कार्यक्रमासाठी घरातल्या सगळ्याच मंडळींची दिवसभर तयारी सुरु आहे!" आता गार व्हायची पाळी माझी होती.

ईतर पाहुण्यांची सरबराई करण्यात ललित गुंग असलेला पाहुन मी पण हळुच मागल्या कोपऱ्यातली जागा पकडुन शांतपणे समोशांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. समोसे तर एकदम लाजवाब होतेच, पण सोबतीला असलेल्या पुदिना आणि चिंचेच्या चटण्याहि तितक्याच चवदार होत्या. प्लेट रिकामी होताच आमची स्वारी परत फराळाच्या टेबलकडे वळली. बघतो तर काय? प्लेटमधल्या समोशांची संख्या बरीच रोडावली होती आणि पाहुणे तर अजुनही येताना दिसत होते. पण खाण्याच्याबाबतीत मी कुणाचीच पर्वा करित नसल्याने हळुच समोशांचा दुसरा हप्ता मी माझ्या प्लेट्मधे सरकवला! (कोण खादाड म्हणतंय रे तिकडे?)

यथावकाश सगळी आमंत्रित मंडळी फराळ संपवुन आपापल्या जागांवर येउन विराजमान झाली. पल्लवीताई आणि काकु मागे येउन बसल्या आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. तशी ललित सगळ्यांच्या मागे जाउन व्हीडिओ कॅमेरामॅनच्या पदावर रुजु झाला. व्याख्यानादरम्यानही तो सगळ्यांचे हवे नको ते पहात होता. मधेच फॅन आणुन लाव, कागदे पोचव, पेन्सिली वाट असे त्याचे काही ना काही चालुच होते. एकुणच व्याख्यान खेळिमेळीच्या वातावरणात पार पडले. व्याख्यान संपताच फराळाच्या टेबलावर समोशांनी रेलचेल भरलेली प्लेट आणुन ठेवली गेली आणि मग मी पण पडत्या फळाची आज्ञा मानुन तिकडे कुच केले. इकडे सगळ्यांच्या गप्पा चालु झाल्या आणि मी हळुच समोशांचा अजुन एक हप्ता माझ्या प्लेट मध्ये सरकावुन दिला (सारखे सारखे खादाड म्ह्टलेले मी मुळिच खपवुन घेणार नाही..आधिच सांगतोय!). ललित सगळ्यांशी बोलण्यात गुंग होता. घरच्या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.

हळुहळु एक एक उपस्थित परतु लागला आणि ललित प्रत्येकाला निरोप द्यायला आवर्जुन घराच्या बाहेर पर्यंत जात होता. मी आणि श्रीनिवास सगळ्यांत शेवटी निघालो. तो खुपच पेंगुळलेला दिसत होत. आदल्या रात्रि कामासाठी केलेल्या जागरणाचा परिणाम होता तो. त्यामुळे जेव्हा मला घरी सोडवायची 'जबाबदारी' त्याने आपणहुन घेतली तेव्हा मला अपराध्यासारखे वाटु लागले. पल्लवीताईने आणि काकूंनी मला परत घरी यायचे आमंत्रण देतच निरोप दिला.

परतीच्या वाटेवर कारमध्ये जगजित आणि चित्राची गझल ऐकता ऐकता मनात विचारांचे तरंग उठत राहीले. कोन कोणति हि माणसे? कोण हा ललित आणि पल्लविताई? अशी कितिशी ओळख आपली त्यांच्याशी. पण थोडयाच भेटींत कोणालाही आपलेसे करुन घेण्याचा त्यांचा स्वभाव पाहील्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. त्यांची अगत्यशिल वागणुक, निर्मळ आणि निर्व्याज मैत्रीची भावना... खरेच..म्हणतात ना की काही लोक जगात 'मित्र' म्हणुनच जन्माला येतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे ते अघोषित मित्र असतात. शहा कुटुंबियही त्यांच्याच पैकी....नाही का?

समाप्त

Sunday, July 23, 2006

चिरा

ऋतुमागूनी जाती ‌ऋतु सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ बहरता तुज पाहीन मी

दुरावलो जरी आज तुजला, रोष नाही सखे तुजसवे
वेदनांचे घनवादळ झेलित एकटाच मूक साहीन मी

गुन्हा काय अन अपराध कुणाचा, अर्थ न उरे त्यास काही
मीच इथला फिर्यादी तरी जामीन तुज राहीन मी

उन्मळून पडलो आज अन जाहलो बेचिराख जरी
होऊनी खग नवफिनिक्स पुन्हा उडुन दाविन मी

यशशिखरावरी जल्लोषामध्ये विसरशिल तु मजला
मनमंदिराच्या पायरीशी तुझिया एक चिरा प्राचिन मी.....

--अविनाश

म(ना)ला भावलेलं.....!

म(ना)ला भावलेलं.....


झेप घेतल्यावर पडलो
तरि
एक समाधान असतं
बसल्या बसल्या पडलो नाही
झेप घेतली होती...

(तुषार जोशी, मायबोली)

परदेश वारी

परदेश वारी

परदेश वारीबद्दल आजवर अनेकांनी लिहीले आहे. खरेतर त्यांच्यासमोर मी म्हणजे कीस झाड की पत्ती.. पण 'कुणीतरी' म्हटलंय ना की 'लिहीणाऱ्याने लिहीत रहावे. आपले कोणी वाचेल की नाही याची पर्वा करु नये' म्हणुन लिहीत जावे असे ठरवले आहे...

तर आमच्या कंपनीचे ऑफ़ीस न्यूयॉर्क ला आहे असे म्हट्ल्यावर त्याबद्दल माहीती गोळा कराय़ला सुरुवात केली आणि... न्यूयोर्क ही अमेरीकेची राजधानी ईथपासुन ते न्यूयोर्क ना? आधी बघून घ्या बुवा नकाशामधे..नक्की अमेरिकेतच आहे ना..इथपर्यंत माहीती मिळाली. पण माझी ही अमेरिका वारी न्यूयोर्क पासुन म्हणन्यापेक्शा चेन्नई पासुनच खऱ्या अर्थाने सुरु झाली.
--------------------------------------------------

चेन्नई

चेन्नई बद्दलही मला विशेष अशी माहीती नव्हती. पण विसा इंटरव्यूला जायची सगळी व्यवस्था कंपनीच करणार असल्याने विषेश चिंता नव्हती. चिंता होती ती इंटरव्य़ूची. त्या बद्दलची अनेक वर्णने आणी तो नापास झालेल्यांचा कॉन्सुलेटच्या नावाने चाललेला शंख ऐकला की पोटात गोळा यायला लागायचा. असेही ऐकुन होतो कि तिथे एक अशी अमेरीकन बाई अशी आहे की तिच्याकडे इंटरव्यूसाठी येणाऱ्या प्रत्येकाला रीजेक्ट करते. ही गोष्ट मी सगळ्यांसमोर हसण्यावारी घालवली असली तरी मनातून चांगलाच टरकुन होतो. माझी तर अशी खात्री होत चालली होती की अमेरिकेची अर्थव्यवस्था ही कॉन्सुलेटमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच इतकी सबळ झाली असली पाहिजे. असो.

होता होता चेन्नईला जायचा दिवस येउन ठेपला. मस्तपैकी ऐटित कार मधे जाउन बसलो (बरेच लोक या कारला 'कॅब' असे म्हनतात. पण असे म्हणने म्हणजे त्या कारचा आणि त्यात बसणाऱ्या माझ्यासारख्यांचा अपमान आहे असे मला वाटते). तर वेळेआधी तासभर कारने मला हैदराबाद एअरपोर्टवर आणून टाकले. 'टाकले' यासाठी कि, मी आणि माझी बॅग कारमधून बाहेर पडतो न पडतो तोच तो गेला पण निघुन! हे 'कॅब'चे ड्रायव्हर आजकाल खुपच शेफारले आहेत. पण म्हटले चला बरे झाले टिपची कटकट वाचली. तशी ती देने मला परवडत नाही अशातला भाग नाही पण त्याला मुख्यत्वे दोन कारणे आहेत.
पहीले म्हणजे हे लोक्स अशा हक्काने आणि आग्रहाने ती मागतात की आपण त्यांचे कोणीतरी देणेकरी आहोत असे वाटायला लागते. आणि समजा दिलीच तर असे काही तोंड करतात की आपण काहीतरी गुन्हा केला आहे असे वाटायला लागते (एकदा तर एका हॉटेलच्या वेटरने ताटात ठेवलेली टीप आम्हाला परत आणुन दिली होती. का तर कुत्सित्पणे म्हणे की असुदे तुम्हालाच तुमच्या कामाला येईल).
दुसरे कारण म्हणजे घरात आपले आईवडिल एक दोन रुपये वाचवण्यासाठी भाजीवाल्याबरोबर हुज्जत घालतात आणि आपण निव्वळ आपले स्टेटस सांभाळण्यासाठी पैसे उधळत सुटलो आहोत असे मला वाटायला लागते.

तसा या एअरपोर्टवर मी या पुर्वीपण बऱ्याचवेळा येउन गेलो आहे आणि दरवेळेस मला एअरपोर्टवर आल्यासारखे न वाटता रेल्वे स्टेशन वर आल्यासारखे वाटते. पण आज मी वेगळयाच मूड्मध्ये होतो. फ़ुकटात विमानप्रवास म्हटले की मी नेहमीच आनंदी असतो. आता तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला या एका तासात काय केले, त्यानंतर एअर ईंडीयाच्या विमानाचा प्रवास कसा त्यांच्या नावाला साजेसा झाला, विमानात काय काय फुकटात चापायला मिळाले असे काहीतरी सांगत बसेन. पण नाही. मी माझा पहीला फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव सांगण्यास फारच उत्सुक असल्याने हे सर्व पुन्हा कधीतरी (हुश्श! वाचलो' असे कोण म्हनाले रे तिकडे?)
मिश्किली
-----------------------------
नमस्कार. खाली एक पत्र देत आहे. हे माझ्या एका चांगल्या मित्राने मला लिहिलेले आहे. बर्याच दिवसांनंतर आमचा संपर्क झाला. मी पाठवलेले frindship invition स्विकारल्याबद्दल त्याला Thakns म्हनण्याची घोड्चुक मी केली आणी हे पत्र त्याचे उत्तर आहे. अगदीच राहवलेच नाहि म्हनुन देत आहे. ईथे मि फ़क्त ट्रान्स्लेटर ची भुमीका बजावली आहे. या पत्राचे यथावकाश उत्तर दे‌इनच आणी जमलेच तर इथे ते टाकीनही. तोपर्यंत या हरहुन्नरी मित्राचा मिश्किलपणा......
-~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार, मैत्रीचे आमंत्रण द्यावे लागत नाही. आमंत्रण देवुन होणारी मैत्री नव्हेच, तो झाला व्यवहार, ज्यात धन्यवाद आणि तत्सम शब्द येतात.़़़़च्या, कसा आहेस असे विचारले असतेस तर बरे वाटले असते.असो.
तु पल्याडल्या देशात गेलास असे कळाले. ऐकुन परमानंद झाला.तिकडे "वातावरण" बरेच चांगले असते अशी ऐकिव बातमी आहे.मी इथे "संध्याकाळच्या मराठी" बातम्या पहातो! "त" म्हटले कि तुला ताकभात कळत असावा. तसा तु लहानपणी खूप ताकभात खायचास असे मला काकू सांगायच्या. त्यामुळे प्रत्यक्षदर्शनी "वातावरणाचे" वर्णन माझ्या पेर्सनल आय डी वर पाठवले तरी चालेल.
"सुटत चाललेला जुना ढग" या शब्दांतली मेख माझ्या लक्षात आलेली आहे. डायरेक्ट क्लीन बोल्ड!!! माझे पोट एवढेपण सुटलेले नाही. बायको थोडेफार खायला घालते त्याची अवकृपा आहे. डायरेक्ट 'ढोल्या' म्हटले असते तरी चालले असते.मला आजवर टोचुन कोणीहि बोललेले नाही (अगदी माझी बायकोसुध्धा!. Thanks to her!. ). माझ्या डोळ्यांत अगदी पाणी आले.इथे पुण्यात पाणीच पाणी झाले आहे. खूपच पा‌उस पडत आहे. बायको घरातच असते. पावसामुळे भाजीपाला महाग झाला आहे. 'भाजीपाला' या सारखा योग्य शब्द मराठीत नाही.लग्न झाल्यापासुन भाजीचा पाला खातो की पाल्याची भाजी हे कळायला मार्ग नाही. शेळीपालनाचा विचार करत आहे.शेळीला पालेभाजी आवडते. मी फ़ारसा विचार करत नाही.तशी सोयही नाही.मलाही शेळी झाल्याची स्वप्ने पडतात.रात्री घोरायच्या ऐवजी बे बे असे ओरडतो. आणि मग बायकोपण.पण ती शेळीसारखी ओरड्त नाही.तिचा आवाज किती 'मंजुळ' आहे हे आजुबाजुच्या पन्नास एक घरांना एव्हाना माहीत झाले आहे.
रामदास स्वामींनी लग्न केले नव्हते. बोहल्यावरुन ते पळुन गेले होते. त्यामुळेच त्यांना 'स्वत:च्या ' मनाचे श्लोक लिहिता आले.जय जय रघुवीर समर्थ. मी आजकाल रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र पण वाचतो.बरे वाटते. फायदा होतो (स्वानुभव!)
बाकी माझे बरे चालले आहे.मी आता सकाळी चालायला लागलो आहे.तु पण सकाळी चालत जा.डायटींग कर. तसे मी माझ्या 'सौं"ना पण सांगुन पाहिले. फ़ारसा 'फ़रक' नाही.जेवण स्वत: करुन खात जा.स्वत: करुन खाण्यात काही औरच मौज आहे.स्वानुभवावरुन बोलतो आहे.पदार्थ खाता येतात.जेवणाला नावे ठेवु नकोस.मी पण ठेवत नाही.एकदाच ठेवुन पाहिली.ते शेवटचेच.
बायकांप्रमाणे पुरुषही कशातही मागे नसतात. ते कुणाच्याही मागे लागत नाहीत.तु ही लागु नकोस. Office मध्ये फ़क्त कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न कर.मी पण करतो. Office हि संकल्पना बहुदा पुरुषानेच चाणाक्षपणे शोधुन काढली असावी असा माझा कयास आहे.त्या निमित्त घराबाहेर मोकळा श्वास घेता येतो.कामाचे तास फ़क्त ८ असतात.मी ओव्हरटा‌इम पण करतो.घरी जायला उशीर होतो.तसा बायकांना आवरायलाही उशिर होतो.पण उशीर उशीर मधे पण फ़रक असतो. तु अजुन लहाण आहेस. बाळपणीचा काळ सुखाचा असे द. मा. मिरासदार म्हणतात.
तुझ्या आजुबाजुला कोण आहे याची आस्थेने चौकशी कर. फ़ायदा होतो (़स्वानुभव नाही़़).गैरफायदा घे‌उ नकोस. तुला तशी सवय नाही म्हणा. पण तरिही... नविन मित्र मैत्रिणी जमव.आत्ताच सोय आहे.मला इथे बरेच मित्र आहेत.मैत्रिणी 'होत्या'.नविन होत नाहीत फारश्या. 'प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलहि गळे' अशी मराठीत एक म्हण आहे.ही म्हण लिहिणार्याने नक्की कोणते प्रयत्न केले असावेत हे कळायला मार्ग नाही.'प्रयत्नांती परमेश्वर' अशीही एक 'भयावह' म्हण आहे. त्यामुळे मी फ़ारसे प्रयत्न करित नाही.
हाती घेशील 'ते' तडिस ने.समुद्रकिनारा हि जागा हातात हात घे‌उन जायला चांगली असते.पुण्यात समुद्र नाही याचे मला वैषम्य वाटते.त्यामुळे मी नदीकिनारी जातो."Behind every successful man there is a woman" या वाक्यात "behind" हा शब्द आहे.बायका विलक्षण चतुर असतात. मी आमच्या सौ. ला चतुरस्त्र म्हनतो.
तिकडे भरपुर फिरुन घे.पुन्हा पुन्हा कंपनीच्या खर्चाने जाने होत नाही.मला इथे 'स्व'खर्चाने खूप फिर फिर फिरावे लागते.पुन्हा पुन्हा फिरावे लागते.पुण्यामध्ये 'लक्ष्मी रोड' आणि 'फ्याशन स्ट्रिट' या एकदम बक्वास जागा आहेत. तसेच खिशाला चाट पडायला इथेपण मोठमोठे मॊल व्हायला लागले आहेत.मी प्रोटेस्ट करण्याचा विचार करीत आहे.त्यातल्या त्यात मला तुलशी बाग खुप आवड्ते.लहानपणापासुनच मला बाग खुप आवडते.इथे मला खुप आल्हाददायक वाटते.
पलिकडे जास्त खरेदी करु नकोस.मा्झ्याकडुन इथे खूप खरेदी होते.स्वत:ला जप. मी पण जपतो. First Aid चा box घे‌उन ठेव. मला अधुन मधुन 'लागतो'.तब्येतीची काळजी घे.शेवटी आपली आपल्यालाच घ्यावी लागते. 'शेवटी' म्हणजे एकदम शेवटी नाही, नेहमीच.
अरे हो, परत धन्यवाद म्हटलेस तर 'रिमोट कानाखाली' लावेन. माझ्याकडे तसे software आहे.मीच तयार केले आहे. टेस्टिंग करायचे आहे अजुन. 'फेल झाले तर काय' असा फुटकळ विचार माझ्या मनात येणार नाही.
पलिकडे जास्त पाडापाडि आणि मारामारी करु नकोस.लिंगोर्चा हा खेळ चांगला आहे.मला लहानपणी पकडापकडीचा खेळ खुप आवडायचा.माझ्यावर नेहमी राज्य या्यचे.मला राज्य घ्यायला खुप आवडायचे.आता फारसे खेळणे होत नाही.खेळात खूप पळापळ होते.आजकाल माझी खुप धावपळ होते.तसे आयुष्य हा पण एक खेळच आहे.पण दुर्दैवाने हा पकडापकडीचा खेळ दोघांतच खेळावा लागतो.सुरुवातीला आपल्याला राज्य घ्यावे असे फार वाटते.पण नंतर सत्तापालट (उलटापालथ) होते आणी राज्याकर्ते बदलतात.आपण धावतच रहातो. असो.
आता जास्त त्रास देत नाही.उरलेला नंतर दे‌इन.
बाकि सर्व क्षेम.
समाप्त