Saturday, July 29, 2006

ललित

ललित


शुक्रवारची संध्याकाळ. अंगावर येणारा आणखी एक विकएन्ड. न्युयॉर्कला येउन मला एक महिना झाला. आणि चारमधले तीन विकएन्ड्स एकटाच घरात बसुन चॅटींग करण्यात आणि कॉम्प्युटरवर पिक्चर बघण्यात घालवलेत. इकडे येताना ड्रायव्हींग लायसन्स न काढल्याबद्दल आत्तापर्यंत स्वतःला शंभर वेळा तरी शिव्या घातल्या असतील. त्यामुळे या विकएन्ड्लापण घरीच बसण्याशिवाय काहीच पर्याय नाही म्हणुन उसासा टाकतच होतो की स्क्रीनवर एक मेसेज झळकला.... ललित शाह.

ललित शाह... एक अजब रसायन. एकदम मोकळा आणि बेफ़िकीर. त्याची आणि माझी ओळख कंपनीच्या एका मिटिंगमधे झालेली. आम्ही एकमेकांना फ़क्त व्हिडिओ कॉन्फ़रन्स मधे पाहीले होते आणि मीटींगनंतर माझ्या जागेवर येउन बसतो न बसतो तोच पठठ्य़ाने मेसेज टाकून मराठीत माझी चौकशी चालवली आणि तीही अगदी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी! वास्तविक माझ्या कंपनीमध्ये तो एका मोठया हुद्द्यावर आहे, पण त्याच्या बोलण्यात कसल्य़ाहीप्रकारचा अभिनिवेश नव्हता. मी अमेरीकेत आल्यापासुन आम्ही कामाच्या व्यापामुळे ('माझ्या कामाच्या व्यापामुळे' असे तो म्हणतो कारण त्याच्या मते तो ऑफिसमधे फ़क्त पाट्या टाकायला जातो! मीही तसे काही फारसे वेगळे करत नाही म्हणा!) फक्त दोनतीनदाच भेटु शकलो होतो.

त्याचा आलेला मेसेग जेव्हा मी उघडला तर त्यात त्याने विचारले होते 'ड्राइव्हींग करतोस का?'. आता मात्र मी अजुनच वैतागलो. अजुन एकदा स्वत:ला शिव्या घालत जेव्हा त्याला कारण विचारले तर म्हणाला, "घरी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलाय आज. येतोस?" मी त्याला माझी ड्रायव्हींगची अडचण सांगितली तसा त्याने लगेच श्रीनिवासबरोबर मला चिकटवुन दिला. मी भलताच खुष झालो. वास्तविक तो घरगुती कार्यक्रम म्हणजे शेअर मार्केटवर एक माहितीवजा व्याख्यान होते आणी तसा माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. पण चारचौघांमधे मिसळण्याची मला संधी मिळत होती हेही नसे थोडके.....

कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी सातची. श्रीनिवासला जरा जास्तच काम असल्यामुळे आम्ही ऑफीसमधून परस्परच जायचे ठरवले. त्याप्रमाणे संध्याकाळी साडेसहाला मी आणि श्रीनिवास त्याच्या कारने ललितकडे निघालो. दहा मिनीटातच आमची गाडी ललितच्या टुमदार दुमजली अपार्टमेंटसमोर येउन थांबली. श्रीनिवास कार पार्क करुन येईपर्यंत मी घराकडे पहात बसलो. घरासमोर एक ऐसपैस कारपार्कींग आणि छानशी हिरवळ. मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर छोट्या छोट्या कुंडयांमधे लावलेली वेगवेगळी शोभेची झाडे. कुंडयांच्या आजुबाजुला गारगोट्यांनी केलेली लक्षवेधी सजावट. एकुणच प्रसन्न वातावरण होते. आत जाताच ललित, त्याची पत्नी पल्लवी आणि पल्लवीच्या आई या सगळ्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले. ललितने त्यांच्याशी माझी ओळख करुन दिली. पल्लवी ताई आणि काकूंनी आस्थेने माझी विचारपुस केली आणि पुढचे दोन अडिच तास मी त्यांच्या घरचाच बनुन राहीलो.

घराच्या बेसमेंटला एक छोटासाच पण १५/२० लोक सहज बसतिल असा एक हॉल होता. तिथेच प्रस्तावित व्याख्यानाची जय्यत तयारी दिसत होती. काही आमंत्रित आधीच येउन बसलेले दिसत होते. एका टबलावर फराळाच्या पदार्थांची रेलचेल दिसत होती. माझे लक्ष वेधले ते समोशांच्या प्लेट्ने. ती रिकामी होण्याआधी फराळाचे आमंत्रण मिळते का नाही याची वाट बघत बसलो. ललितने तिथे बसलेल्या सगळ्यांशी ओळख करुन दिली तरि माझा एक डोळा समोशांच्या प्लेटवरच. ललितला बहुतेक माझ्या मनातले समजले असावे कारण त्याने लगेच मला फराळाला चलण्याचा आग्रह केला. मी पण 'नेकी और पुंछ पुंछ असे म्हणत (मनातल्या मनातच!) फराळाच्या टेबलकडे माझा मोर्चा वळवला. सुदैवाने अजुनही बरेचसे समोसे प्लेट्मध्ये दिसत होते आणि आनंदाने मी समोशांचा माझा पहिला हप्ता उचलला. तेवढ्यात ललितने मला एक गारेगार शितपेयही आणुन दिले. मी त्याला विचारले की एवढे सगळे पदार्थ आणले कुठुन? त्यावर हसत हसत तो म्हणाला, " आणतोय कुठुन?आम्ही सगळ्यांनी मिळुन घरीच बनवले आहेत. या कार्यक्रमासाठी घरातल्या सगळ्याच मंडळींची दिवसभर तयारी सुरु आहे!" आता गार व्हायची पाळी माझी होती.

ईतर पाहुण्यांची सरबराई करण्यात ललित गुंग असलेला पाहुन मी पण हळुच मागल्या कोपऱ्यातली जागा पकडुन शांतपणे समोशांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. समोसे तर एकदम लाजवाब होतेच, पण सोबतीला असलेल्या पुदिना आणि चिंचेच्या चटण्याहि तितक्याच चवदार होत्या. प्लेट रिकामी होताच आमची स्वारी परत फराळाच्या टेबलकडे वळली. बघतो तर काय? प्लेटमधल्या समोशांची संख्या बरीच रोडावली होती आणि पाहुणे तर अजुनही येताना दिसत होते. पण खाण्याच्याबाबतीत मी कुणाचीच पर्वा करित नसल्याने हळुच समोशांचा दुसरा हप्ता मी माझ्या प्लेट्मधे सरकवला! (कोण खादाड म्हणतंय रे तिकडे?)

यथावकाश सगळी आमंत्रित मंडळी फराळ संपवुन आपापल्या जागांवर येउन विराजमान झाली. पल्लवीताई आणि काकु मागे येउन बसल्या आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. तशी ललित सगळ्यांच्या मागे जाउन व्हीडिओ कॅमेरामॅनच्या पदावर रुजु झाला. व्याख्यानादरम्यानही तो सगळ्यांचे हवे नको ते पहात होता. मधेच फॅन आणुन लाव, कागदे पोचव, पेन्सिली वाट असे त्याचे काही ना काही चालुच होते. एकुणच व्याख्यान खेळिमेळीच्या वातावरणात पार पडले. व्याख्यान संपताच फराळाच्या टेबलावर समोशांनी रेलचेल भरलेली प्लेट आणुन ठेवली गेली आणि मग मी पण पडत्या फळाची आज्ञा मानुन तिकडे कुच केले. इकडे सगळ्यांच्या गप्पा चालु झाल्या आणि मी हळुच समोशांचा अजुन एक हप्ता माझ्या प्लेट मध्ये सरकावुन दिला (सारखे सारखे खादाड म्ह्टलेले मी मुळिच खपवुन घेणार नाही..आधिच सांगतोय!). ललित सगळ्यांशी बोलण्यात गुंग होता. घरच्या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.

हळुहळु एक एक उपस्थित परतु लागला आणि ललित प्रत्येकाला निरोप द्यायला आवर्जुन घराच्या बाहेर पर्यंत जात होता. मी आणि श्रीनिवास सगळ्यांत शेवटी निघालो. तो खुपच पेंगुळलेला दिसत होत. आदल्या रात्रि कामासाठी केलेल्या जागरणाचा परिणाम होता तो. त्यामुळे जेव्हा मला घरी सोडवायची 'जबाबदारी' त्याने आपणहुन घेतली तेव्हा मला अपराध्यासारखे वाटु लागले. पल्लवीताईने आणि काकूंनी मला परत घरी यायचे आमंत्रण देतच निरोप दिला.

परतीच्या वाटेवर कारमध्ये जगजित आणि चित्राची गझल ऐकता ऐकता मनात विचारांचे तरंग उठत राहीले. कोन कोणति हि माणसे? कोण हा ललित आणि पल्लविताई? अशी कितिशी ओळख आपली त्यांच्याशी. पण थोडयाच भेटींत कोणालाही आपलेसे करुन घेण्याचा त्यांचा स्वभाव पाहील्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. त्यांची अगत्यशिल वागणुक, निर्मळ आणि निर्व्याज मैत्रीची भावना... खरेच..म्हणतात ना की काही लोक जगात 'मित्र' म्हणुनच जन्माला येतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे ते अघोषित मित्र असतात. शहा कुटुंबियही त्यांच्याच पैकी....नाही का?

समाप्त

No comments:

Post a Comment