Saturday, April 26, 2008

व्यथा

व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही

वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही

घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
रक्त तुजसाठी तरी, रावणा, मी सांडणार नाही

तुडवतील सहजा सहजी, ते कोवळ्या भावनांना
लक्तरे वेदनांची वेशी, अता मी टांगणार नाही

भोगीन भोग सारे, मी पुण्य सारे विसरुनी
सावळ्या हरीशी तरी, बघा, मी भांडणार नाही

--अवि

No comments:

Post a Comment