Tuesday, May 12, 2009

कितीदा....?

वेदनांच्या सरणावरती, मी जळलो कितीदा
संवेदनांना तुझ्या तरी, मी कळलो कितीदा?


प्रेमविरोधी दळण दळले आजवरी, पण हरलो
बघता बघता जात्यामध्ये, मी आदळलो कितीदा


मनमोहक तुझ्या अदांवरी, भाळलो नित्य असा
तोल दिलाचा जाता जाता, मी सांभाळलो कितीदा


जळलो, संपलो कधीचा, त्या प्रिती कटाक्षाने
नयनी तव सामावण्या, मी ’काजळ’लो कितीदा


संध्यावेळी वळलो तुजला, निरोप द्यायला जेव्हा
विरहाने तुझ्या सखे, बघ, मी मावळलो कितीदा

-- अविनाश

No comments:

Post a Comment