Thursday, February 21, 2013

समाधान!

१९९७ साली, १० वी नंतर स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणी आता आपण कॉलेज कुमार झालो या भावनेने पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या.

स. प. विद्यालयात दोनच वर्ष होतो मी, पण माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत स. प. महविद्यालयाचा प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष असा फार मोलाचा वाटा आहे.

मी आणि माझा मित्र सुशांत दोघेही मध्यमवर्गीय घरांमधुन. म्हणजे खिशामधे एक बसचा पास आणि ५ किंवा १० रुपये जास्तीत जास्त. दोघेही स. प. कॅंटीनमधे दुपारी डबा खाण्यासाठी जमत असु. पण डबा खाता खाता कँटीनमधे दरवळणारा विविध पदार्थांचा सुवास आम्हाला आशाळभुतासारखा इतरांच्या ताटाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचा. आपणही काहितरी घ्यावे असं खुप वाटायचं... पण ऐपतच नाही तर काय करणार! यावर आम्ही दोघांनी एक उपाय शोधुन काढला. आम्हाला कळलं की तिथे एक वाटी सांबार एक रुपयाला मिळतं. मग काय, रोज आळीपाळीनं मी आणि सुशांत एक वाटी सांबार मागवायचो आणी डब्यातली चपाती त्यात थोडी थोडी बुडवुन दोघे खायचो. काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद असायचा त्यात. (तुम्ही हसताय!...पण एक वाटी सांबारकी किमत तुम क्या जानो रमेशबाबू!!!) तसं ते सांबारही तितकंच स्वादिष्ट होतं.. किमान आमच्यासाठी तरी. दोनतीन महिन्यांतून एकदा एक 'बनवडा' घ्यायचो आणि तो दोघांत अर्धाअर्धा खायचो. त्या दिवशी आनंदाने दिवसभर आमची गाडी हवेत असायची.

अजुनही सुशांत, मी आणी आमच्या बायका (बायकोचं अनेकवचन 'बायका'च ना वो?) ते दिवस आठवून खुप हसतो आणी जुन्या आठवणींमध्ये बुडून जातो.

खरे तर स. प. महाविद्यालयाच्या बाहेर असलेलं S.S. Canteen हेच कॉलेज कँटीन नावाला साजेसं होतं. तिथं असलेल्या so called modern ललनांकडे पाहुन आम्ही दोघंही अचंबित व्हायचो. आणी दोघेही त्यांच्या नावाने शंख करायचो. काय करणार्..कोल्ह्याला द्राक्षे आंबट!.. हडपसरचा बस स्टॉप निलायम चौकात असल्याने आम्हाला रोज S. S. समोरुनच जावे लागायचे आणी खिसे चाचपुन कधी कधी गाडी आतमधेही वळायची आमची. त्यावेळी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कसं हादडता येईल याचं गणित चालायचं डोक्यात. एकदा हे गणित कायमचंच सोडवलं आम्ही दोघांनी मिळुन. S S मध्ये 'समोसा-पाव' नावाचा प्रकार मिळत असे. त्यासोबत चिंचेची आंबट-गोड चटणी आणि तळलेल्या मिरच्या आपल्या हातानेच घ्यायच्या असा शिरस्ता होता. मग काय, आम्ही भरपुर चटणी ताटात वाढून घ्यायचो आणी पावातून समोसा बाजुला काढुन ठेवून फक्त मिरची आणि पावाबरोबर सगळी चटणी सफाचट करायचो. त्यानंतर मग पुन्हा जाउन चटणी आणायची आणि या वेळी ती मिरची अन समोशाबरोबर खायची!!! तर अशा रितीने एकाच पदार्थाच्या किमतीत दोन पदार्थ खाल्ल्याचे समाधान आम्ही मिळवत असू.

खिशात पैसे नसल्याची कसर आम्ही मनात भरपुर 'समाधान' भरुन घेउन भरुन काढायचो. मागे वळून पहाताना आता वाटतं, स्वतःच स्वतःच्या मनाला समजावनं खुप सोपं होतं तेव्हा. एक वाटी सांबारानं हॉटेलमधे जेवल्याचं समाधान.... भरपुर चटणी-मिरची खाउन पोट भरल्याचं समाधान.... मनातल्या मनात 'एखादी'वर जीव टाकुन प्रेमात पडल्याचं समाधान... कधी मधे J M Road आणि Ferguson Road वर चकरा मारुन आपणही मॉडर्न असल्याचं समाधान.... आणि असंच बरंच काही. मुळात आईवडिलांनी पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल दहावी तर आई चौथी पास..पण त्यांनी आपल्या मुलांसाठी पाहीलेलं स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसाठी केलेली परिस्थितीशी लढाई हे नेहमीच आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी होतं. आजही आई जेव्हा "माझी तीनही मुलं 'साप्टेर इंजीनर' आहेत" असं अभिमानानं सांगते तेव्हा, आईवडिलांच्या अपे़क्षांना आपण खरं उतरु शकलो या जाणीवेनं मिळणारं समाधान हे खरंच खुप मोलाचं असतं...'अलौकीक' असतं.

[मायबोली.कॉम येथे पूर्वप्रकाशित    http://www.maayboli.com/node/1869  ]
2 comments:

  1. Shahzmeen12:34 AM

    Awesome.........
    The Way You wrote Is Amazing, Simple Biography But Touching.

    ReplyDelete
  2. Nice post, things explained in details. Thank You.

    ReplyDelete