Thursday, October 09, 2014

हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही.

कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!


तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.


नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.
फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो.

जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.


वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.


तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!